(मुंबई)
मुंबई येथे MDS चे शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अँटॉप हिल परिसरातील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सहा पानी सुसाईड नोट सापडली असून त्यात प्रियकराकडून चारित्र्यावर संशय घेतल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सुसाईड नोटमध्ये नात्याचा उल्लेख
मृत विद्यार्थिनीचे नाव डॉ. स्तुती सोनावणे (वय २४) असे असून ती नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालय येथे दंतचिकित्सा विषयात पदव्युत्तर (MDS) शिक्षण घेत होती. सुसाईड नोटमध्ये स्तुतीने मोहम्मद फुझीयाल नावाच्या तरुणासोबत संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. नोटमध्ये सुरुवातीला दोघांमध्ये संबंध चांगले असल्याचे नमूद केले असून नंतर वाद वाढल्याचे लिहिले आहे. सुरुवातीला आनंदी असलेल्या या नात्यात नंतर फैजुलने तिला ‘कॅरेक्टरलेस’ म्हणणे, अश्लील भाषेत अपमान करणे आणि तिचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केल्याचे समोर आले आहे. वादांदरम्यान संबंधित तरुण तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गलिच्छ आरोप करत असल्याचेही स्तुतीने नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. “तुझ्या शब्दांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम केला असून ते आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे आहेत… तुझा पुरुषी अहंकार आता तरी शांत झाला असेल,” अशा शब्दांत स्तुतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मित्रांकडून केलेल्या टोमण्यांचाही उल्लेख
सुसाईड नोटमध्ये अप्रत्यक्षपणे श्रद्धा वालकर प्रकरणाचा संदर्भही आढळून आला आहे. मित्रमैत्रिणी मस्करीत “एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील” असे म्हणत टोमणे मारत असल्याचा उल्लेखही नोटमध्ये करण्यात आला आहे. डॉ. स्तुती सोनावणे या आई-वडील आणि बहिणीसोबत अँटॉप हिल येथे राहत होत्या. रविवारी रात्री त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद झाला. सोमवारी सकाळी बराच वेळ झाला तरी त्या खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर स्तुती यांनी नायलॉनची ओढणी वापरून गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना तातडीने सायन रुग्णालय येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. स्तुती सोनावणे यांनी नायर हॉस्पिटल मधून दंतचिकित्सेची पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर त्या डी. वाय. पाटील रुग्णालय येथे MDS चे शिक्षण घेत होत्या. तसेच श्री दशमेश दरबार ट्रस्ट हॉस्पिटल येथे गेल्या दोन वर्षांपासून प्रॅक्टिस करत होत्या.
या घटनेनंतर समाजातील विविध स्तरांतून डॉ. स्तुती सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

