(नवी दिल्ली)
महाराष्ट्रात २०१२ साली दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या रवी अशोक घुमारे याची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. २०२२ मध्ये राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती मुर्मूंनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे.
काय आहे प्रकरण?
रवी अशोक घुमारे याने ८ मार्च २०१२ रोजी जालन्यातील इंदिरानगर परिसरात दोन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणात १६ सप्टेंबर २०१५ रोजी स्थानिक न्यायालयाने घुमारे याला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निरीक्षण
फाशीची शिक्षा कायम ठेवताना न्या. सूर्यकांत आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांनी आपल्या निकालात घुमारेच्या कृत्याला “क्षमेस पात्र नसलेले” असे संबोधले. आरोपीने लैंगिक भूक शमवण्यासाठी सर्व नैसर्गिक, सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा ओलांडल्या, असे न्यायालयाने नमूद केले होते.
न्यायालयाने पुढे म्हटले होते की, “मुलीचे आयुष्य फुलण्याआधीच निष्ठुरपणे संपवले गेले. जिथे वडीलकीचे प्रेम, संरक्षण आणि आपुलकी मिळायला हवी होती, तिथे तिला वासनेचा बळी बनवण्यात आले. हे प्रकरण विश्वासघाताचे, सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचे आणि विकृत मनोवृत्तीचे प्रतीक आहे.”
राष्ट्रपतींचा अंतिम निर्णय
सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि यापूर्वीची दयेची याचिका फेटाळण्यात आल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेरची दयेची याचिका फेटाळून फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला काही अंशी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

