(चिपळूण / वार्ताहर)
अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या वतीने आयोजित ‘गणेश गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘गणेश गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शशिकांत चव्हाण हे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून, गरजू रुग्णांना आरोग्यसेवेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, राजाभाऊ पाटणकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मिलिंद कापडी, वसंत उदेग, रमण डांगे, समीर जानवलकर, सुनील कुलकर्णी, प्रभंजन पिंपुटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नित्यानंद भागवत यांनी केले.


