(चिपळूण)
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेता लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह संपूर्ण कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे ठाम विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकण हा निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग आहे. येथे औद्योगिक विकास गरजेचा असला तरी तो पर्यावरणपूरक, स्थानिकांच्या आरोग्याला सुरक्षित आणि शेती व मत्स्यव्यवसायाला धक्का न लावणारा असलाच पाहिजे. प्रदूषण वाढवणाऱ्या प्रकल्पांमुळे कोकणच्या आरोग्यावर आणि उपजीविकेवर परिणाम होत असेल, तर असे प्रकल्प सरकार मान्य करणार नाही.
लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पाविरोधात वाढता विरोध
लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे संभाव्य प्रदूषण होण्याच्या मुद्द्यावरून चिपळूण, खेड आणि लोटे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र विरोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
पुढील कारवाई काय? प्रश्न कायम
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई होणार, परवानग्या रद्द केल्या जाणार का, किंवा शासन स्तरावर कोणते ठोस आदेश निघणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ आश्वासन न देता ठोस निर्णय घेण्यात यावेत. कोकणातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रदूषणकारी उद्योगांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
कोकणासाठी निर्णायक क्षण?
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या या घोषणेमुळे महायुती सरकार पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या घोषणेनंतर प्रत्यक्ष निर्णय आणि तातडीची कारवाई झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

सर्वांना पुरून उरणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम
दापोली विधानसभा मतदारसंघात सर्व विरोधक एकत्र येऊन मला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मी सर्वांना पुरून उरेन, असा सूचक आणि थेट इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत त्यांनी हे विधान केल्याने दापोली मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती झाली आहे. संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातही महायुती झाली असली, तरी चिपळूण मतदारसंघात मात्र अद्याप युती झालेली नाही. तर दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
या सभेत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना खातेही उघडता आले नाही. काही कारणांमुळे येथे युती झाली नसली, तरी या निवडणुकीत मला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चिपळूणमधील सभा महायुतीची असल्याने अधिक बोलणार नाही. तरीही विरोधकांनी लक्षात ठेवावे की, मी सर्वांना पुरून उरेन.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली मतदारसंघात विरोधक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना कितपत अडचणीत आणतात, की कदम आपल्या विधानाप्रमाणे सर्वांवर भारी पडतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या सभेला उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

