(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच गुन्हा घडूच नये, यासाठी समाजाला आधीच सजग करणे या प्रतिबंधात्मक पोलिसिंगच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. वाढते सायबर गुन्हे, रस्ते अपघात, पॉक्सोअंतर्गत गुन्हे आणि अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता थेट ग्रामसभांमध्ये पोहोचणार आहेत. जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या ६५३ ग्रामसभांमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत. हा उपक्रम ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसपी नितीन बगाटेंचे ‘मिशन प्रबोधन’ नेमके काय आहे (व्हिडिओ बघा)… https://youtube.com/shorts/rQHmO8KFXN4?si=unuhIJjz6jTnv_wu
हाती घेण्यात आलेले ‘मिशन प्रबोधन’ हे अभियान राज्यातच नव्हे, तर देशात अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते. नागरिकांमध्ये वेळोवेळी जनजागृती करूनही काही प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केवळ कारवाईवर भर न देता गुन्हेगारीला कारणीभूत ठरणाऱ्या बाबींविषयी नागरिकांमध्ये वेळीच जागरूकता निर्माण करणे, हा ‘मिशन प्रबोधन’मागील मुख्य विचार आहे. ग्रामसभा हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, कारण स्वतंत्रपणे नागरिकांना एकत्र बोलावण्याची आवश्यकता नसताना ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असतात.
सायबर फसवणुकीबाबत वारंवार जनजागृती करूनही नागरिकांची फसवणूक होत असल्याने ही बाब चिंताजनक असल्याचे बगाटे यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, याबाबतही ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पॉक्सोअंतर्गत गुन्ह्यांच्या संदर्भातही समाजाने अधिक सजग होण्याची गरज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अशा प्रकरणांच्या तपासात जवळच्या परिचित किंवा नातेवाईकांकडूनही प्रकार घडल्याचे निदर्शनास येत असल्याने बालकांची सुरक्षितता, संशयास्पद वर्तनाची वेळीच दखल आणि कायदेशीर संरक्षणाच्या तरतुदी याबाबत पालक व ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाणार आहे. अमली पदार्थांच्या धोक्याबाबतही विशेष जनजागृती केली जाणार आहे. कारवाईसोबतच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि समाजाचा सहभाग वाढविणे, हा या प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग असेल.
यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील ६५३ ग्रामसभांचे वेळापत्रक घेण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संबंधित ग्रामसभांना उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधतील. स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेण्याबरोबरच सायबर सुरक्षितता, बालकांची सुरक्षा, अमली पदार्थ, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यापूर्वीही रत्नागिरी पोलिसांनी विविध नागरिकाभिमुख मोहिमांद्वारे जनजागृतीवर भर दिला आहे. ‘मिशन प्रबोधन’च्या माध्यमातून या प्रयत्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. अलीकडील माहितीनुसार या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.
‘बगाटे मॉडेल’ची वेगळी दिशा
पोलिसिंगची पारंपरिक व्याख्या अनेकदा गुन्हा घडणे, गुन्हा दाखल करणे, तपास आणि कारवाई या चौकटीत पाहिली जाते. ‘मिशन प्रबोधन’ मात्र त्यापूर्वीची पायरी अधिक महत्त्वाची मानते. गुन्हा होण्याआधी समाजाला सजग करणे. हीच या उपक्रमाची खरी वेगळी दिशा आहे. नागरिकांनी कोणत्या प्रसंगी सावध राहावे, ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, बालकांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी काय लक्षात घ्यावे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून तरुणांना कसे दूर ठेवावे आणि वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, याचे ज्ञान थेट गावपातळीवर पोहोचल्यास प्रतिबंधात्मक पोलिसिंगला बळ मिळू शकते. ‘गुन्हे दाखल करण्याची संख्या वाढविण्यापेक्षा गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना आळा घालण्यासाठी समाजाला सोबत घेणे’ ही भूमिका प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न म्हणून ‘मिशन प्रबोधन’कडे पाहता येते. पोलिसांचा गणवेश ग्रामसभेपर्यंत आणि सुरक्षिततेचा संदेश घराघरांपर्यंत नेण्याची एसपी नितीन बगाटे यांची ही संकल्पना नागरिक-पोलिस संवादाला नवी दिशा देणारी ठरत आहे.


