(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूणची योगपटू कु. तन्वी रेडीज हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणाचा मान उंचावला असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिपळूण येथील पाग व्यायामशाळेची खेळाडू असलेली तन्वी सध्या नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयात बी.एस्सी. अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत तिने गुजरातमध्ये आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते.
या जागतिक स्पर्धेत ५५ हून अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात तन्वीने आपल्या कौशल्य, लवचिकता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अप्रतिम सादरीकरण करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तन्वीने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. २०२५ मध्ये झालेल्या एशियन योगासन चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्णपदके जिंकून आपली छाप पाडली होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने तब्बल १० सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
तन्वीच्या यशामागे तिचे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या जागतिक कामगिरीबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, पाग व्यायामशाळेचे प्रमुख व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी, सुधीर भागवत, सुधारकर काळे, गिरिधर भागवत, विजय चितळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

