(चिपळूण)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा फेरबदल केला आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विक्रांत भास्करराव जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव असलेले विक्रांत जाधव हे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सातत्याने कार्यरत असून, युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संघटन अधिक मजबूत करण्याची आणि पक्षाला ग्रामीण भागात बळकट करण्याची मोठी जबाबदारी आता विक्रांत जाधव यांच्या खांद्यावर आली आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत उत्तर रत्नागिरीतील शिवसैनिक आणि युवक कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य, तसेच युवकांमध्ये असलेली लोकप्रियता पाहता ही निवड स्थानिक राजकारणात नवे समीकरण घडवणारी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

