(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी)
एसटी महामंडळाची ‘लालपरी’ सध्या आर्थिक खडतर प्रवासातून मार्ग काढत असताना, दुसरीकडे मात्र तिच्याच छत्रछायेखाली काही महाभागांची ‘खाजगी दुकानदारी’ जोरात सुरू असल्याचा चमत्कारीक प्रकार समोर आला आहे! ऐन गणेशोत्सवाच्या परतीच्या प्रवासात, जेव्हा हजारो चाकरमानी लालपरीच्या रांगेत तासनतास ताटकळत उभे होते, तेव्हा महामंडळाचे एक ‘कर्तव्यदक्ष’ महोदय एसटीच्या ड्युटीला रामराम ठोकून खाजगी गाड्यांचे बुकिंग करण्यात मग्न असल्याचा सणसणीत व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गंमत म्हणजे, एसटी प्रशासनाने ज्या जागेवर मोठ्या दिमाखात ‘२०० मीटर नो पार्किंग’ असा फलक लावला आहे, अगदी त्याच फलकाच्या सावलीत आणि बसस्थानकाच्या अवघ्या काही पावलांवर हे खाजगी बुकिंग सेंटर थाटण्यात आल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच, नियमांचा फलक फक्त सामान्य प्रवाशांना दाखवण्यासाठी अन् आतमध्ये मात्र ‘आपलंच राज्य’ अशा थाटात हा कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. व्हायरल व्हिडिओतील दृश्यांनुसार, महामंडळाचा पगार घ्यायचा, महामंडळाचीच वेळ मारायची आणि एसटीच्याच आवारात खाजगी वाहनांची गिऱ्हाईके शोधायची, असा हा ‘एकच नंबर’ व्यवहार सुरू आहे. यात आणखी एक रंजक वळण म्हणजे, या महोदयांवर कारवाई करायला गेलो की थेट ‘राजकीय आशीर्वादाचा’ कवचकुंडल मिळतो, अशी चर्चा आगारात रंगली आहे. अधिकारीही यांच्यापुढे हात जोडतात की काय, अशी शंका यावी इतकी ‘संशयास्पद शांतता’ प्रशासनाने धारण केली आहे.
नियम फक्त सामान्य कर्मचाऱ्यांसाठीच का?
महामंडळाच्या सेवा नियमांनुसार (कलम १२ ब च्या चर्चेनुसार) एसटीचा कर्मचारी असा खाजगी धंदा करू शकतो का? दहशत की दबावाची साखळी? आगारात सहकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना धाकाखाली ठेवून हा कारभार चालवला जात असेल, तर शिस्त नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? हातावर पोट असणारा सामान्य कर्मचारी ५ मिनिटे उशिरा आला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणारे प्रशासन, अशा ‘खाजगी एजंट’ बनलेल्या कर्मचाऱ्यांसमोर डोळे झाकून बसले आहे का?
आता तरी चौकशीचा ‘रिंगण सोहळा’ होणार का?
केवळ व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कोणाला दोषी धरणे घाईचे ठरेल, पण त्या दिवशीची उपस्थिती (हजेरी पट), ड्युटीची वेळ आणि बसस्थानकाबाहेरील कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले तर “दुध का दुध अन् पानी का पानी” व्हायला वेळ लागणार नाही. “लाखांच्या विश्वासाची” जीवनवाहिनी असलेली लालपरी कोणाच्या खाजगी कमाईचे साधन बनू नये, अशीच प्रवाशांची अपेक्षा आहे. आता या ‘खाजगी कारभारावर’ वरिष्ठ अधिकारी कारवाईचे चाबूक चालवतात की राजकीय दबावाखाली ही फाईलही ‘नो पार्किंग’मध्ये जमा होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


