(मंडणगड/ रत्नागिरी)
काही दिवसांपासून तापाने आजारी असलेल्या मंडणगड तालुक्यातील ८० वर्षीय वृद्धेचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना पर्शुराम घाटाजवळ मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. सरस्वती जानू माळी (८०, रा. तुळशी पोस्ट, पालेकोंड, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती माळी या काही दिवसांपासून तापाने आजारी होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सरस्वती माळी यांना १०८ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी डेरवणकडे नेण्यात येत होते. मात्र, पर्शुराम घाट परिसरात रुग्णवाहिका पोहोचली असता त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती चिपळूण पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर तेथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रकरणाची कागदपत्रे प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलिस ठाण्यातही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूच्या घटनेबाबत पोलिसांकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


