(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधी रुपयांचा खर्च, व्यापक लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही राज्यात नवजात व बालमृत्यूची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात ४३ महिन्यांत नवजात बालकांचे मृत्यू नोंदले गेले असून १ ते ५ वर्षे वयोगटातील बालमृत्यूदरात १.५४ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गेल्या आठ महिन्यांत ० ते ५ वयोगटातील तब्बल ८९ बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय व खासगी रुग्णालयांत सुमारे ७ हजार ५०० प्रसूती झाल्या. याच कालावधीत ८९ बालकांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. अकाली जन्म, कमी वजन, श्वसनविकार, संसर्गजन्य आजार, जन्मजात दोष अथवा विकृती, कुपोषण तसेच प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतरची अपुरी काळजी ही बालमृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध पातळ्यांवर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व तपासण्या, वेळेवर उपचार, पोषण आहार, लसीकरण आणि प्रसूतीनंतरची आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम मातामृत्यू रोखण्यात दिसून आला असून आठ महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांमुळे केवळ दोन मातांचे मृत्यू झाले आहेत. मातामृत्यू आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी बालमृत्यूचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरत असून बालकांच्या आरोग्यसेवेत आणखी प्रभावी उपाययोजना, वेळेवर उपचार आणि व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

