(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शासकीय रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर (ओटी) परिसरातील आजूबाजूच्या खोल्यांची डागडुजी सध्या युद्धपातळीवर सुरू असून, काम सुरू असतानाही उपचारसेवेवर कोणताही परिणाम होऊ दिला जात नसल्याचे चित्र समोर आले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे काही खोल्यांमध्ये माती व धुळीचे प्रमाण वाढले असले, तरी ओटीमधील डॉक्टरांची ये-जा आणि रुग्णांची शस्त्रक्रिया नियमितपणे सुरू असल्याने रुग्णसेवेची साखळी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे.
या सुरू असलेल्या कामाकडे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सांगवीकर यांची सकाळ, संध्याकाळ अशी नियमित पाहणी सुरू असल्याने हे काम वेगाने सुरू आहे. ओटी परिसरातील खोल्यांची पूर्वस्थिती अत्यंत जीर्ण झाली होती. या खोल्यांमध्ये डॉक्टरांना विश्रांती घ्यावी लागत असते. विशेषतः पावसाळ्यात गळती, ओलावा अशा परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे निदर्शनास येत होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डागडुजीचे काम हाती घेतले असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील एक महिन्याच्या आत काम पूर्ण होईल, असा विश्वास वैद्यकीय अधीक्षक सांगवीकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काम सुरू असतानाही स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविले जात आहे. रुग्णालय प्रशासनाने दुरुस्ती आणि रुग्णसेवा यामध्ये समतोल राखत काम पूर्ण करण्याचे एकप्रकारे आव्हान स्वीकारले आहे. तसेच कामकाज पूर्णत्वास गेल्यानंतर शासकीय रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर (ओटी) परिसराचा कायापालट झालेला पाहायला मिळणार आहे. नव्याने डागडुजी करण्यात आलेल्या खोल्या, स्वच्छता आणि सुबक नियोजनामुळे ओटी परिसर अधिक टापटीप, सुरक्षित आणि अत्याधुनिक स्वरूपात उभा राहणार आहे.

