(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्राचीन पाली भाषेच्या अध्ययनातून बुद्धांच्या विचारांचा अधिक सखोल वेध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लांजा तालुक्यातील तळवडे येथील एन. बी. कदम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथे राबविण्यात आलेल्या ‘डिप्लोमा इन पाली’ या एक वर्षीय अभ्यासक्रमाच्या एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांनी डिस्टिंक्शनसह रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमध्ये हा मान मिळविणारे ते जिल्ह्यातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात त्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. नोकरी, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, तसेच विविध जबाबदाऱ्यांचा व्याप सांभाळत त्यांनी अभ्यासासाठी वेळ काढला. चिकाटी, मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले. या यशामागे प्रा. दिलीप वामनराव वासनिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे कदम यांनी आवर्जून सांगितले. पाली व्याकरण, पाली त्रिपिटक आणि पाली साहित्याचा अभ्यास करताना सुरुवातीला नवी भाषा आणि तिचे व्याकरण समजून घेणे आव्हानात्मक वाटले. मात्र नियमित अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनामुळे हा प्रवास सुकर झाल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढे कदम म्हणाले, “पाली ही केवळ एक भाषा नसून ती भगवान बुद्धांची भाषा आहे. मानवाच्या सुख, कल्याण आणि हितासाठी बुद्धांनी दिलेली शिकवण याच भाषेतून जगापर्यंत पोहोचली. पाली भाषेचा अभ्यास केल्यास बुद्धांच्या चौर्याऐंशी हजार स्कंधांमधील तत्त्वज्ञान अधिक सहजपणे समजते आणि त्यांच्या विचारांशी अधिक जवळीक निर्माण होते.” पाली भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर तिच्या अध्ययनाबाबत नव्याने जागरूकता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीने पाली भाषा शिकून तिचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही कदम यांनी केले. बौद्ध अनुयायी म्हणून ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
समाजात बौद्धाचार्य म्हणून ओळख असलेले एन. बी. कदम हे भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. बौद्ध धम्माचा अभ्यास, आचरण आणि प्रसार हे आपल्या जीवनकार्याचा अविभाज्य भाग मानणारे कदम गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्याख्याने, धम्मपर प्रवचने आणि प्रबोधनपर मार्गदर्शन करत आहेत. भगवान बुद्धांनी दिलेला समता, करुणा, प्रज्ञा आणि अहिंसेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते सातत्याने करीत असून, विशेषतः युवकांमध्ये धम्म, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
धम्मप्रबोधनाच्या या व्यापक कार्यासोबतच त्यांनी पाली भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. बुद्धवचने मूळ पाली भाषेत समजून घेण्याची जिज्ञासा आणि समाजाला अधिक अचूक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करता यावे, या उद्देशाने त्यांनी ‘डिप्लोमा इन पाली’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे हे शैक्षणिक यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून धम्मसेवा, ज्ञानसाधना आणि समाजप्रबोधन यांचा संगम ठरला आहे.

