(मंडणगड/ रत्नागिरी)
महिलेचे फोटो काढल्याच्या संशयावरून तरुणाला दोन भावांनी घरात घुसून लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना मंडणगड तालुक्यातील कादवण येथे घडल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने घरात असलेले म्हशींना देण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दोघांविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास कादवण येथील फिर्यादी अनुसया संभाजी सोंडकर यांच्या घरी घडली. त्या वेळी अनुसया सोंडकर, त्यांचे पती तसेच मुलगा सुरज आणि मुलगी सुजाता हे सर्वजण घरी होते. त्यावेळी अनुसया यांचे चुलत दीर मिलिंद सोंडकर आणि त्यांचा भाऊ मनोज सोंडकर हे तेथे आले. दोघांनी सुरज याच्याकडील मोबाइल फोन घेतला. त्यानंतर मनोज सोंडकर याने सुरजला ‘तू माझी पत्नी अर्चना हिचे फोटो काढले आहेत; तिच्याशी तुझा काय संबंध आहे?’, असा जाब विचारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रश्नावरून वाद वाढला आणि दोघांनी मिळून सुरजला लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली. यावेळी त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. घरच्यांसमोर झालेल्या या मारहाणीमुळे सुरज घाबरल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास, सुरजने घरात असलेले म्हशींना देण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिस नोंदीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी सुरुवातीला नवापाडा पोलिस ठाणे शहर येथे गुन्हा क्रमांक ००६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रकरण मंडणगड पोलिस ठाण्यात प्राप्त झाले. या प्रकरणी मिलिंद सोंडकर (वय ३५) आणि मनोज सोंडकर (वय ४१, दोघेही रा. कादवण, ता. मंडणगड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मंडणगड पोलिसांकडून सुरू आहे.


