(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ खड्डे चांगलेच दणके देत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कामांसाठी दररोज येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली आणि आकार समजत नसल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नागरिकांमध्ये नाराजीचे सूर असून, खड्ड्यांतून प्रवास करायचा की ऍडव्हेंचर पार्कमध्ये झुला घ्यायचा? असा मिश्कील शैलीत सवाल उपस्थित केला जात आहे.
या मार्गालगतच रिक्षा स्टँड असल्याने रिक्षाचालकांनाही खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांच्या धक्क्यांमुळे प्रवासीही अस्वस्थ होत असून, रिक्षांची ये-जा देखील अडथळ्यांची झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने गाड्या गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांवर पाणी उडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यातून होणारी गैरसोय आणि अपमानजनक परिस्थिती यामुळे त्रस्त नागरिक फक्त एकमेकांकडे पाहत “बोलावे कोणाला?” असा प्रश्न उपस्थित करत पुढची वाट धरतात.
शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असले तरी जिल्हा परिषदेच्या दारातच असलेल्या रस्त्याचे दुर्लक्षित राहणे म्हणजे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हच आहे, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. रत्नागिरी खड्डेमुक्त होणार तरी कधी? असा रोषजनक प्रश्न आता उभा राहत असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारा जवळील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.