.( मंडणगड )
येथील एसटी आगारात इंधन आणणाऱ्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टँकरचा चालक आणि क्लिनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड एसटी आगारासाठी आलेल्या टँकरची तपासणी केली असता संशयास्पद हालचाली आढळल्या. आगार अधिकारी मदनीपाशा बहाउद्दीन जुनेदी यांनी तातडीने तपास सुरू केला असता चालक व क्लिनरने डिझेल चोरीसाठी टँकरमध्ये गुप्त कप्पा तयार केल्याचे स्पष्ट झाले. टाकीच्या झाकणाजवळ अतिरिक्त वॉल लावून मुख्य टाकीतील डिझेल या कप्प्यात वळवले जात होते.
या प्रकरणी चालक मोहन शामराव देवकत (४०, डोंगरगाव, जि. सोलापूर) आणि क्लिनर शाहू भीमराव सूर्यवंशी (२७, मिरज, जि. सांगली) अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी ५,४२५ रुपयांचे डिझेल जप्त केले आहे. मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

