(मंडणगड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा उलगडा करत मंडणगड पोलिसांनी संशयित प्रकाश गंगाराम वाजे (वय ४०, सध्या रा. शेनाळे) याला अटक केली आहे. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून संतापाच्या भरात झोपेत असलेल्या सदू मोकाशी यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
या प्रकरणी विजय काते (रा. शेनाळे) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सदू मोकाशी आणि प्रकाश वाजे हे एकत्र मद्यपान करत असताना त्यांच्यात वाद झाला. दारू कमी दिल्याचा राग मनात धरून प्रकाश वाजे याने मोकाशी झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारला. या गंभीर हल्ल्यात सदू मोकाशी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत. या खूनप्रकरणामागील सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

