(रत्नागिरी/ मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील सावित्री नदी व बाणकोट खाडीपात्रातील खाजन भागात गुरुवारी (९ जुलै) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलिसांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिपोळे ते उमरोली जेटीदरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीपात्रातील खाजन भागात हा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच बाणकोट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तो तरुण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी बाणकोट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविणे आणि घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे बाणकोट परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, मृत व्यक्तीची ओळख पटल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

