(मंडणगड /रत्नागिरी)
गावात फिरत असताना दगडाला ठेचकळून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ५९ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. विनोद महादेव गायकवाड (वय ५९, रा. कुंबळे-पाटीलवाडी, ता. मंडणगड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास विनोद गायकवाड गावात फिरत असताना कुंबळे बसस्थानकाजवळ दगडाला ठेचकळून पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मंडणगड येथे ही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना माणगाव येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले. तेथील उपचारांच्या मर्यादांमुळे पुढील उपचारांसाठी त्यांना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मुंबईतील भायखळा येथील सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असताना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद मुंबईतील जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यासंदर्भातील कागदपत्रे टपालाद्वारे मंडणगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर येथे आकस्मिक मृत्यू क्रमांक २०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


