(रत्नागिरी / वार्ताहर)
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ४२ हजार ३४ वाहतूक केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात ७३४ कारवाया करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाहतूक नियमभंगाविरोधातील कारवाईबरोबरच जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेतील मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती वाढविण्यावरही भर देण्याची गरज आहे. विशेषतः मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि चुकीच्या पद्धतीने पार्किंग यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
पोलिसांच्या कारवाईसोबत नागरिकांनीही वाहतूक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करणे आवश्यक आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस, नगरपालिका आणि संबंधित विभागांनी नियमित समन्वय साधणे गरजेचे आहे. रत्नागिरी शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यालगत होणारी भाजीविक्री तसेच महामार्गावरील अपुरे किंवा स्पष्टपणे न दिसणारे दिशादर्शक व सुरक्षा फलक हे प्रश्न अद्याप कायम आहेत. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची समस्या अधिक तीव्र होते. साधारण सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान या भागात भाजीविक्रेते, ग्राहकांची गर्दी, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि वाढलेली वाहनांची वर्दळ यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यातच रस्त्यावरच भाजीविक्री होत असल्याने वाहनांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध जागा कमी होते.
या समस्येवर केवळ वाहतूक पोलिसांची कारवाई हा कायमस्वरूपी उपाय ठरणार नाही. नगरपालिकेने वाहतूक विभागाशी समन्वय साधून बैठक घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांसाठी पर्यायी आणि नियोजित जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक कोंडीची मूळ कारणे दूर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.
महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनचालकांना वेगमर्यादा, पुढील वळण, गावांची माहिती, धोकादायक ठिकाणे आणि इतर सुरक्षा सूचना स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील दिशादर्शक तसेच सुरक्षा फलकांची संख्या, त्यांची स्थिती आणि दृश्यमानता यांची संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी करण्याची गरज आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच रस्त्यांची रचना, पार्किंगची व्यवस्था, बाजारपेठांचे नियोजन, दिशादर्शक फलक आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थापन या बाबींवरही समन्वयाने उपाययोजना झाल्यास शहरातील तसेच जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होऊ शकते.
या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे उपस्थित होते.


