(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने ‘२ लाख ग्रंथ संकलन’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला असून, त्यासाठी रत्नागिरीकरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला ग्रंथ किंवा ग्रंथनिधी स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. सुधीर दामले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला २५ हजार रुपयांची देणगी दिली.
गुरुवार, दि. २१ मे रोजी श्री. दामले यांनी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ‘२ लाख ग्रंथ संकलन’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपले योगदान देताना समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“इतक्या पुरातन आणि वैभवशाली वाचनालयाला आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ खरेदीसाठी निधी देताना मनापासून धन्यता वाटते. ग्रंथसेवा हीच ईश्वरसेवा आहे. आपल्या रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवात योगदान देता आले, याचा विशेष आनंद आहे,” असे श्री. सुधीर दामले यांनी सांगितले.
यावेळी वाचनालयाच्या वतीने श्री. दामले यांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रंथ खरेदीसाठी योगदान देत त्यांनी रत्नागिरीकरांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

