(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीच्या समुद्रकिनारी नियमबाह्य मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाने गस्त आणि तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत तीन नौकांवर नियमभंगप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन स्क्विड जिगिंग नौका आणि एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एका नौकेचा समावेश आहे.
मत्स्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २२ सप्टेंबरच्या रात्री समुद्रात गस्त घालत असताना दोन स्क्विड जिगिंग नौका आढळून आल्या. त्यामध्ये ‘Sania Hafsa’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3851) या नौकेचा समावेश असून तिचे मालक सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर आहेत. तसेच ‘H. Simak’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-601) या नौकेचे मालक सुलताना अख्तर होडेकर आहेत. या दोन्ही नौकांवर मत्स्य विभागाने नियमानुसार कारवाई केली.
यानंतर २३ सप्टेंबर रोजी करला जेट्टी येथे करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ‘Guruprasad’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3766) या नौकेवर एलईडी दिव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. या नौकेच्या मालक सुगंधा सुरेश ताकले असून, नियमबाह्य पद्धतीने एलईडीच्या साहाय्याने मासेमारी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विभागाने संबंधित नौकेवरही कारवाई केली.
महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात एलईडी दिव्यांच्या सहाय्याने मासेमारी करण्यास प्रतिबंध असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकृत माहितीत नमूद आहे. अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत कारवाईची तरतूद आहे.
दरम्यान, रत्नागिरीच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि नियमांचे पालन करणाऱ्या मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी समुद्रातील गस्तीसोबतच जेट्टी व बंदर परिसरातही तपासणी सुरू ठेवण्यात येत आहे. संशयास्पद नौकांची तपासणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई करण्यावर विभागाचा भर आहे.
अवैध किंवा नियमबाह्य मासेमारीमुळे सागरी मत्स्यसंपत्तीवर तसेच नियमांचे पालन करणाऱ्या मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा तपासण्या नियमितपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्व मच्छीमारांनी लागू असलेल्या नियमांचे पालन करूनच मासेमारी करावी, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.


