(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याला वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात आलेल्या सहा आठवड्यांच्या अल्पकालीन जामिनाची मुदत संपल्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आंबेरकर स्वतःहून न्यायालयात हजर झाला, त्यानंतर त्याला जेल वॉरंटसह कारागृहात पाठविण्यात आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंबेरकर हा १३ जानेवारी २०२६ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांसाठी सशर्त जामिनावर बाहेर होता. मुदत पूर्ण झाल्यानंतर आदेशाप्रमाणे तो न्यायालयात स्वतःहून उपस्थित राहिला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित अर्जावर आदेश पारित करून आरोपीला पुन्हा न्यायालयीन कोठडीत घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आरोपी आंबेरकरला तात्काळ न्यायालयीन कोठडीत घेत जेल वॉरंटसह कारागृहात रवाना करण्यात आले.
दरम्यान, आरोपी पक्षाकडून कागदपत्रे दाखल करण्यासाठीचा अर्ज मंजूर करण्यात आला होता, संबंधित कागदपत्रांची यादीही न्यायालयात सादर करण्यात आली आहे. सरकार पक्षानेही आपल्या म्हणण्यासंदर्भातील लेखी निवेदन दाखल केले. पत्रकार वारिशे खून प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले असून प्रत्येक न्यायालयीन घडामोडीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
न्यायालयीन कोठडीनंतरही खटल्याची सुनावणी सुरूच
वैद्यकीय कारणास्तव मिळालेल्या जामिनाची मुदत संपल्यानंतर आरोपीची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतरही खटल्याची सुनावणी नियमितपणे पुढे सरकत असल्याचे न्यायालयीन नोंदीतून स्पष्ट होत आहे. न्यायालयाने आरोपीला कारागृहात पाठवल्यानंतर २४ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, ५ मार्च आणि १० मार्च अशा सलग चार तारखांना प्रकरणाची सुनावणी झाली असून प्रत्येक वेळी ‘Evidence Part Heard’ अशी नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच साक्षी, पुरावे आणि तपासाच्या प्रक्रियेशी संबंधित कामकाज न्यायालयात सुरू असल्याचे दिसून येते. १७ मार्च रोजी पुन्हा सुनावणीदरम्यान पुढील टप्प्यासाठी आता २४ मार्चची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे खटल्यातील पुराव्यांचा भाग अद्याप निर्णायक टप्प्यात असून पुढील काही तारखा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

