(पोलादपूर / शैलेश पालकर)
पोलादपूर तालुक्यातील लोहारे-देऊळकोंड येथे कौटुंबिक वादातून स्वतःच्या मुलाच्या छातीवर चाकूने वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी सचिन बजरंग चिकणे (४३) याच्याविरुद्ध पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीची पत्नी संध्या चिकणे यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला महाड शहरातील बी. एस. बुटाला सभागृहाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून ताब्यात घेतले.
ही घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. सचिन चिकणे आणि त्याची पत्नी संध्या हे घरातील सामान खरेदी करण्यासाठी पोलादपूर बाजारात आले होते. संध्या दूध आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर सचिन तेथून निघून गेला. त्यामुळे दोघांची भेट झाली नाही. त्यानंतर सचिन एकटाच देऊळकोंड येथील घरी पोहोचला.
काही वेळाने संध्या घरी पोहोचल्यानंतर सचिनने, ‘तुला बस डेपोत बोलावले होते, तू का आली नाहीस?’ असे विचारत तिच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘तुमची सर्वांची अकड काढतो’, असे म्हणत तो किचनमध्ये गेला.
यावेळी त्यांचा मोठा मुलगा साई याने वडिलांना आईला का बोलत आहात, असे समजावण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान सचिनने किचनमध्ये कांदा कापण्यासाठी वापरलेल्या सुरीने साईच्या छातीच्या डाव्या बाजूस भोसकल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्याने साई जमिनीवर कोसळला. त्यानंतर सचिनने घटनास्थळावरून महाडच्या दिशेने पळ काढला.
या घटनेनंतर संध्या चिकणे यांच्या फिर्यादीवरून पोलादपूर पोलिसांनी सचिन बजरंग चिकणे याच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३ (१), ३५२ तसेच भारतीय दंड विधानातील कलम ३०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, तपासादरम्यान सचिन चिकणे याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. मुंबईतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान १८६० मधील कलम ३५४, ३५४ (ड), ५०४ आणि ५०९ अन्वये २०२० मध्ये गुन्हा दाखल असल्याची नोंद आढळून आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी महाड शहरात सापळा रचला. डीवायएसपी प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. बुटाला सभागृहाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सचिन चिकणे याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, मुंबई, पुणे तसेच राज्यातील अन्य शहरांमध्ये गुन्हे दाखल असलेले आणि पोलादपूर तालुक्यात वास्तव्यास येणारे व्यक्ती याबाबत घरमालकांनी पोलादपूर पोलिस ठाण्याला माहिती द्यावी, अशी आवश्यकता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करण्यात आली आहे.
फोटो : लोहारे-देऊळकोंड येथे मुलाला चाकूने भोसकून ठार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन चिकणे याला महाड शहरातील बी. एस. बुटाला सभागृहाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात ताब्यात घेतल्याचे दृश्य. डीवायएसपी प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (छाया : शैलेश पालकर)


