(मुंबई)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक कारणांमुळे किंवा नजरचुकीने चुकीची माहिती भरलेल्या महिलांना आता आपल्या अर्जात ऑनलाईन सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.
नेमकी अडचण काय होती?
योजनेंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत मोठ्या संख्येने महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत का किंवा निवृत्तीवेतन घेत आहेत का, या पर्यायाबाबत अनेक लाभार्थ्यांकडून चुकीची नोंद झाली. त्यामुळे प्रत्यक्षात पात्र असूनही काही महिलांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही चूक लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली, तरी लाभार्थींना दिलासा देण्यासाठी शासनाने आता थेट ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
31 मार्च 2026 पर्यंत अर्ज दुरुस्तीची संधी
ज्या महिलांच्या अर्जात कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असल्याबाबत किंवा निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती चुकीची नोंदली गेली आहे, त्या महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसीतील माहिती दुरुस्त करता येणार आहे.
शासनाचे स्पष्ट निर्देश
ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदलही करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी लाभार्थींनी www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी (सांकेतांक: 202602061212231330). योजनेचा लाभ सुरू राहावा यासाठी पात्र महिलांनी वेळेत ई-केवायसीतील दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

