( मुंबई )
राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’च्या पुढील टप्प्यात 405 शाळा विकसित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय ‘विकसित महाराष्ट्र-2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यानंतर आता 405 शाळांचा समावेश
यापूर्वी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 478 शाळांची निवड करण्यात आली होती आणि त्या शाळांमधील कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता नव्याने निवडलेल्या 405 शाळांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि सुसज्ज शिक्षण सुविधा मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेसाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, तसेच RO किंवा UV फिल्टर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अखंड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल.
शिक्षक भरतीला गती
राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तात्पुरत्या नियुक्त्यांद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार असून, ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून नियमित भरती प्रक्रियेलाही गती देण्यात येणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की, यापूर्वी 9,214 उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून 2017 आणि 2022 मध्ये एकूण 23,871 उमेदवारांची निवड झाली आहे.
लवकरच नवी भरती प्रक्रिया
2025 मधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या दोन महिन्यांत नव्या शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. या भरतीत कला, क्रीडा यांसारख्या विषयांतील पदांचाही समावेश असेल. या निर्णयामुळे राज्यातील शाळांची भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना समतोल आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षकांची उपलब्धता वाढवणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

