(नवी दिल्ली)
निकाल देण्यास विलंब होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर नाराजी व्यक्त करत फटकार लगावली. उच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती पूर्ण समर्पणाने दिवसरात्र काम करतात, तर काही त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यात अपयशी ठरतात. सर्वोच्च न्यायालय शाळेच्या मुख्याध्यापकांसारखे वागू इच्छित नाही. परंतु प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी मूल्यांकन करणे आवश्यक आहे, असे न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी फौजदारी खटल्यांशी संबंधित अपिलांना उत्तर देताना केली, जिथे काही जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींनी झारखंड उच्च न्यायालयाने वर्षानुवर्षे आपले निकाल राखून ठेवले आहेत. त्यांच्या फौजदारी अपिलांवर निकाल दिले नाहीत, असा आरोप करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी टिप्पणी केली की, काही न्यायमूर्ती अनावश्यकपणे खटले पुढे ढकलण्याची सवय आहे. हे न्यायमूर्तीच्या प्रतिष्ठेला हानिकारक ठरू शकते. भूतकाळात काही न्यायमूर्तीसोबत अशा घटना घडल्या आहेत.
न्यायमूर्ती सूर्य कांत यावेळी म्हणाले की, प्रत्येक न्यायमूर्तीकडे स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी एक मापदंड असावा. प्रत्येक न्यायमूर्तीकडे एक स्व-व्यवस्थापन प्रणाली असावी जेणेकरून त्यांच्या डेस्कवर फायलींचा ढीग होणार नाही याची खात्री होईल. काही न्यायाधीश दिवसरात्र काम करतात आणि शक्य तितक्या लवकर खटले निकाली काढत असतात. पण त्याच वेळी काही न्यायाधीश असे आहेत जे दुर्दैवाने त्यांचे काम पूर्ण करू शकत नाहीत.
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?
“समजा एखादा न्यायमूर्ती फौजदारी अपीलाची सुनावणी करत असेल, तर आपण त्याच्याकडून एका दिवसात ५० खटले निकाली काढण्याची अपेक्षा करत नाही. परंतु जर एखादा न्यायमूर्ती दिवसातून फक्त एकच जामिनाचा खटला निकाली काढत असेल तर त्याला आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे आम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांसारखे वागण्याचा हेतू नाही. परंतु काही मार्गदर्शक तत्त्वे असली पाहिजेत जेणेकरून न्यायमूर्तीना कळेल की त्यांच्यासमोर कोणती कामे आहेत, त्यांना किती काम पूर्ण करायचे आहे. लोकांना न्यायव्यवस्थेकडून रास्त अपेक्षा आहेत.”

