(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे आज (बुधवार, २३ सप्टेंबर २०२६) रोजी ‘आयुर्वेद दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ ही होती. या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. जी. मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद, योग आणि सकस आहार यांची सांगड कशी घालता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षणी यांनी उपस्थितांना आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व तसेच दैनंदिन जीवनातील आयुर्वेदाच्या विविध उपयोगांची सविस्तर माहिती दिली. आयुर्वेदाचा दैनंदिन जीवनशैलीत योग्य पद्धतीने वापर करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त रुग्णालय परिसरात विविध बहुगुणी व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या वनस्पतींची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्याचबरोबर स्थानिक भागात आढळणाऱ्या पौष्टिक आणि आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले.
अंगणवाडी सेविकांनी पौष्टिक आहारावर आधारित विविध अन्नपदार्थांचेही प्रदर्शन मांडले. या माध्यमातून उत्तम आरोग्यासाठी संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘आयुर्वेद आणि सेवा संकल्प व अवयवदान’ याबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून ‘आयुर्वेद दिन’ कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.


