( चिपळूण / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनातील मुद्द्यांना राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा बैठकीत महत्त्व मिळाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
१० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर बाळा खेडेकर यांनी हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी प्रकाशव्यवस्था करावी, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अपघातांची कारणे शोधून ती दूर करावीत आणि प्रवाशांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशा मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या होत्या.
यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १३व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण, अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना, ब्लॅक स्पॉट्सचे विश्लेषण तसेच अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने वैद्यकीय उपचार देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य रस्ता सुरक्षा परिषद ही रस्ते सुरक्षेशी संबंधित उपाययोजना, धोरणांची अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी कार्यरत असलेली यंत्रणा आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर खेडेकर यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेल्या निवेदनात रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्य रस्ता सुरक्षा परिषदेत रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण, अपघातप्रवण ठिकाणांचे विश्लेषण आणि आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजनांवर भर देण्यात आल्याने निवेदनातील मुद्द्यांना शासनस्तरावर महत्त्व मिळाल्याचे युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाने म्हटले आहे.
“आम्ही केवळ निवेदन देऊन थांबणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावर एकही जीव निष्काळजीपणामुळे जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. आमच्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन रस्ता सुरक्षेच्या विषयाला महत्त्व दिल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी महामार्गावर दिसली पाहिजे,” असे बाळा खेडेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक ठिकाणी प्रकाशव्यवस्था, ब्लॅक स्पॉट्सवर तातडीने उपाययोजना, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने कायम ठेवली आहे.
“निवेदनाची दखल घेतली, हा जिल्ह्यातील नागरिकांच्या आवाजाचा विजय आहे; आता अपघात रोखण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना झाल्या पाहिजेत,” अशी भूमिका युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्ता सुरक्षेच्या प्रश्नाला दिलेल्या प्राधान्याबद्दल युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.


