(जैतापूर / वार्ताहर)
बेनगी नागलेवाडी येथे ‘शंतनु इन्फोटेक प्रा. लिमिटेड’ पुरस्कृत आणि ‘घुरडेश्वर युवा क्रिकेट संघ’ आयोजित ‘बेनगी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’ ही भव्य क्रिकेट स्पर्धा ९ ते ११ मे दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात पावस येथील ‘श्री महाकाली समर्थ’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामना ‘श्री महाकाली समर्थ, पावस’ आणि ‘जे.सी.सी. खालचा भंडारवाडा, भालावली’ या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अष्टपैलू खेळाच्या जोरावर पावस संघाने बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले. विजेत्या संघाला ४५ हजार रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या संघाला २७ हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार अहमद नाखवा याने पटकावला. ‘जे.सी.सी. भालावली’च्या प्रथमेश भोसले याला सर्वोत्कृष्ट फलंदाज, तर अरफान नाखवा याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले. यजमान बेनगी संघाच्या अभि वारीक याने एका सामन्यात एकही धाव न देता तब्बल ५ गडी बाद करण्याचा दुर्मिळ पराक्रम करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मैदानावरील पॅव्हेलियन उडून गेले होते. तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दोन दिवसांचे यूट्यूबवरील थेट प्रक्षेपण बंद ठेवावे लागले. मात्र आयोजकांच्या जिद्द, नियोजन आणि अथक मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. पहिल्या दिवशी ‘रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह’च्या माध्यमातून श्री. सौरभ मयेकर यांनी सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले.
बक्षीस वितरण समारंभाला बेनगीचे पोलीस पाटील प्रमोद वारीक, काशिनाथ नागले, विलास नागले, प्रकाश नागले, सुधाकर वारीशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन योगेश खडपे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘घुरडेश्वर युवा बेनगी नागलेवाडी’च्या सर्व खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विकास वारीक सर यांनी स्पर्धेचे प्रायोजक संदीप बिर्जे यांचे विशेष आभार मानले.

