(राजापूर /रत्नागिरी)
गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबासह माहेरी गेलेल्या महिलेचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६७ हजार ४६८ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खरवते-वाणीवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सानिका संतोष गोरे (वय ४०, रा. खरवते, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे कुटुंबीय १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घराला आणि मुख्य गेटला कुलूप लावून पती व मुलीसह गौरी-गणपती दर्शनासाठी माहेरी तळवडे, ता. राजापूर येथे गेले होते. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. अज्ञात चोरट्याने हत्याराच्या साहाय्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्टडी रूम आणि बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात विविध प्रकारचे सोन्याचे कानातील दागिने, सोन्याची अंगठी, सोन्याच्या मुद्या, नाकातील सोन्याची फुली, सोन्याचे लॉकेट, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, कमरेची साखळी, चांदीचा कॉईन तसेच ३० हजार रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.
या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६७ हजार ४६८ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त घर बंद करून कुटुंबीय बाहेर गेले असताना चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, बंद घरांवर पाळत ठेवणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


