(चिपळूण /रत्नागिरी)
चिपळूण तालुक्यातील टेरव येथे लोकवस्तीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरविरोधात ग्रामस्थ महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी तूर्तास स्थगित करण्यात आले. संबंधित कंपनीने आवश्यक कागदपत्रे सादर करेपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र महावितरणला देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी केल्याने या प्रश्नाच्या पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टेरव येथे मोबाईल टॉवर उभारण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते. मात्र, ग्रामस्थांचा विरोध डावलून कंपनीने लोकवस्तीत टॉवर उभारल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लोकवस्तीत मोबाईल टॉवर नको, अशी ठाम भूमिका घेत महिलांनी १६ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. मोबाईल टॉवरची आवश्यकता मान्य असली, तरी तो लोकवस्तीपासून दूर उभारण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांनी पर्यायी जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शविली होती.
या प्रश्नावर बुधवारी संबंधित अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. मात्र, चर्चेतून ठोस तोडगा न निघाल्याने महिलांनी उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, गुरुवारी ग्रामपंचायतीने कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे सादर होईपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, यासाठी महावितरणला पत्र देण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी केली.
या प्रशासकीय हालचालींमुळे प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दिशेने पुढील कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत महिलांनी साखळी उपोषण तूर्तास स्थगित केले. मात्र, उपोषण स्थगित झाले असले, तरी टॉवरबाबतचा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. संबंधित कंपनीची कागदपत्रे, मोजणीचा निष्कर्ष आणि प्रशासनाची पुढील भूमिका यावरच या प्रश्नाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करते, याकडे टेरववासीयांचे लक्ष लागले आहे.


