(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील ओवळी (बौद्धवाडी) येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा अखेर वन विभागाच्या यशस्वी कारवाईने पूर्णविराम लागला. श्री. विलास मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यात ६ जुलैपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत होते. वन्यप्राणी काही वेळ गोठ्यात बसून राहत होता व नंतर निघून जात होता. ही माहिती मिळताच वन विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत उपाययोजना सुरू केल्या.

सदर प्रकार समजताच वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कृष्णा इरमले आणि राहुल गुंठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुरुवातीला ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावण्यात आले. मात्र बिबट्या गोठ्यात येऊन बसत राहिल्याने पिंजऱ्यात न अडकता थेट गुरांच्या गोठ्यातच बसत होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाहणीदरम्यान बिबट्या अशक्त व आजारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अधिक सखोल नियोजन आवश्यक असल्याचं ठरलं. ११ जुलै रोजी विभागीय वनाधिकारी श्रीम. गिरिजा देसाई यांच्या सूचनेनुसार सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन गोठ्यातच पिंजरा बसवून त्यात भक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. या नियोजनाला यश आले आणि त्याच रात्री ८.३० वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला. तो अंदाजे ४ ते ५ वर्षांचा नर असून त्याच्या मानेवर जखम आढळली. वन विभागाने तातडीने कारवाई करत जखमी बिबट्याला पुणे येथील रेस्क्यू ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवले.
या यशस्वी बचाव मोहिमेत विभागीय वनाधिकारी श्रीम. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक श्रीम. लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. परदेशी, वनपाल एस. एस. सावंत, सुरेश उपरे, वनरक्षक कृष्णा इरमले, राहुल गुंठे व वाहनचालक नंदकुमार कदम यांचा मोलाचा सहभाग होता. याशिवाय ओवळी गावचे पोलीस पाटील अजिंक्य शिंदे यांच्यासह ग्रामस्थ शुभम शिंदे, वेदांत शिंदे, उदय कदम, दशरथ शिंदे, सुजल शिंदे, आर्यन घाग, धावू शेळके, मुंकुद हिलम, संदीप सावंत आणि गोटा मालक विलास शिंदे व सुरेश शिंदे यांनीही मोलाची मदत केली.

