(चिपळूण)
चिपळूण : हिंदी विषय शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि अध्यापन कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळ व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा दिनांक २२ जुलै २०२५ रोजी परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे उत्साहात पार पडली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कांबळे, पर्यवेक्षक शिवाजीराव शिंदे, हिंदी समिती अध्यक्षा सलीमा नदाफ, तज्ञ मार्गदर्शक युवराज जाधव व मानसी पेढांबकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तीमय केले.
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. युवराज जाधव यांनी ‘रोजगार की भाषा हिंदी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेतील रोजगार संधी, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन, आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावी पोहोच कशी साधावी, याचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले.
तसेच युनायटेड इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सौ. मानसी पेढांबकर यांनी “परीक्षा पे चर्चा” या उपक्रमांतर्गत उपयोजित लेखन, स्वमत अभिव्यक्ती, तसेच व्याकरणातील क्लुप्त्या याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत राज्यस्तरीय हिंदी मंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत हिंदीच्या प्रसारासाठी शिक्षकांनी सक्रीय भूमिका बजावावी, असा संदेश दिला.
प्रशिक्षणार्थींमध्ये रवींद्र गुरव व कलावती साठे यांनी व्याकरण प्रयोग, कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीमा नदाफ यांनी केले. स्वागत राजेश माळी, निलेश नागे, उज्वला लोखंडे, राखी भुरण, सचिन पोकळे, मोहन पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज पिरजादे यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. उज्वला लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी शिक्षकांना फुलझाडांची रोपे भेट देऊन पर्यावरणप्रेमाचे संदेश देण्यात आले.

