(रत्नागिरी / वार्ताहर)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेत खगोलशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शरद संपात दिन (विषुव दिन) उत्साहात साजरा केला. या खगोलीय घटनेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून खगोलशास्त्रातील विविध बारकावे समजून घेतले.
या उपक्रमासाठी पुणे येथील प्रा. उमेश चव्हाण विशेषत्वाने उपस्थित होते. प्रा. बाबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी शरद संपात दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारी आकर्षक भित्तीपत्रके तयार केली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी जमिनीत सरळ काठी रोवून तिच्या सावलीची लांबी अचूकपणे नोंदवली. या निरीक्षणांच्या आधारे आवश्यक गणिते करून रत्नागिरी शहराचे अक्षांश ९५ टक्क्यांपर्यंत अचूक मोजण्याचा प्रयोग विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे केला.
कार्यक्रमादरम्यान खास दुर्बिणीद्वारे सुरक्षित पद्धतीने सूर्यनिरीक्षण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर डाग प्रत्यक्ष पाहता आले. या उपक्रमाला भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भूषण ढाले, डॉ. विवेक भिडे, प्रा. निशा केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी मयुरेश तांबे आणि स्वरांगी म्हैसकर यांनी विशेष मेहनत घेतली.
पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून केलेल्या या उपक्रमशील अभ्यासाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विशेष कौतुक केले.
शरद संपात दिनाचे खगोलीय महत्त्व स्पष्ट करताना प्रा. बाबासाहेब सुतार यांनी सांगितले की, या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. त्यामुळे सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. परिणामी दिवस आणि रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजेच समान असतात. तसेच या दिवशी सावलीच्या प्रयोगाच्या आधारे कोणत्याही स्थानाचे अक्षांश सहजपणे काढता येतात.


