(रत्नागिरी)
शहरानजीक राजिवडा येथे घरात घुसून धुडघूस घालणाऱ्या सात जणांपैकी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राजिवड्यातील फिर्यादी महिलेच्या घरात घुसून सातजणांनी घरातील वस्तू इकडेतिकडे फेकल्या. पती कुठे आहेत, त्यांना ठार मारतो, असे सांगून मुलाला शाळेतून आणण्यास गेलेल्या पती अब्दुल्ला वस्ता यांना अडवून बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. ही घटना दि. २७ नोव्हेंबर रोजी घडली होती. गुन्ह्यातील सात पैकी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये अमीर मुजावर, मुजफ्फर मुजावर, फैजान फणसोपकर, जमीर मुजावर, सलमान पकाली (सर्व रा.राजीवडा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. संशयितांनी मारहाण केलेले अब्दुल्ला वस्ता गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र या हल्ल्यात वापरलेल्या लोखंडी सळ्या जप्त करायच्या आहेत. शाहरुख पकाली व अरमान मुजावर हे दोघे फरार असून, त्यांच्या अटकेसाठी संशयितांना पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.