(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील ऐतिहासिक थिबापॅलेस परिसरात मंगळवारी सकाळी एका मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. प्रसंगावधान राखत परिसरातील नागरिकांनी संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी थिबापॅलेस परिसरात बहुरूपी कलाकाराचा वेश परिधान केलेला एक मुलगा वावरत होता. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने या मुलाला फुस लावून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला पळवून नेले जात असल्याचे लक्षात येताच मुलाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
मुलाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तरुणाला नागरिकांनी घेरून जागीच पकडले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ही व्यक्ती मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो रत्नागिरीत कोणत्या उद्देशाने आला होता आणि मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यामागील नेमके कारण काय, याचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


