खेड रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेच्या हातातील तब्बल ₹1,45,000 किंमतीची सोन्याची बांगडी लांबवणाऱ्या चोरट्याला अखेर लोहमार्ग गुन्हे शाखेने जेरबंद केले. अटक केलेल्या संशयिताचे नाव अभिजीत जितू पवार (वय 27, रा. अंबरनाथ, ठाणे) असे असून त्याने आपल्या साथीदार निलेश गायकवाड यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे चौकशीत मान्य केले आहे. पोलिसांनी चोरीस गेलेली अंदाजे 14 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडीही हस्तगत केली आहे.
दहिसर (मुंबई) येथील 69 वर्षीय रंजना पालंडे या 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3.20 वाजता खेड रेल्वे स्टेशनवर 10106 सावंतवाडी–दिवा एक्सप्रेसच्या डी-3 कोचमध्ये चढत होत्या. प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी काही क्षणात लांबवली आणि तेथून पसार झाला. पालंडे यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर लोहमार्ग गुन्हे शाखेच्या नेरूळ युनिटने सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास सुरू केला. तपासादरम्यान 12 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी पनवेल स्थानकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पनवेल स्टेशनवर सापळा रचून अभिजीत पवारला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये एम. राकेश कलासागर – पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, सुनिता ठाकरे–साळुंके – पोलीस उपआयुक्त, पश्चिम परिमंडळ, प्रज्ञा जेडगे – पोलीस उपआयुक्त, मध्य परिमंडळ, राजेंद्र रानमळे – सपोआ., गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांचा समावेश होता.
तर प्रत्यक्ष ऑपरेशन पार पाडणाऱ्या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, निरीक्षक प्रदीप पाडवी, पीएसआय सुनिल लोणकर, एसपीआय सुधाकर सावंत, तसेच हवालदार विकास नलगे, सुनिल खोत, जनार्दन पुलेकर, रणजित रासकर, अतुल धायडे, सुरेश एल्ला, इम्रान शेख, प्रशांत रेडकर, सुनिल मागाडे यांचा समावेश होता. तसेच रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.हवा. मंगेश खाडे यांनीही तपासात मोलाची भूमिका बजावली.
लोहमार्ग पोलिसांच्या जलद आणि समन्वित कारवाईमुळे ज्येष्ठ महिलेची बांगडी सुखरूप परत मिळाली असून संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

