(राजापूर / तुषार पाचलकर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, पंचायत समिती राजापूर आणि राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय अजिंक्यपद पटकावले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत पाचल प्रशालेच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच चुरशीच्या सामन्यांत दमदार खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि प्रभावी खेळाच्या जोरावर संघाने अंतिम सामन्यातही दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेश सावंत, कार्याध्यक्ष मा. श्री. अशोक सक्रे, सचिव श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव मा. श्री. किशोर नारकर, खजिनदार मा. श्री. राजन लब्दे तसेच सर्व संचालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. आशा गुरखे, पर्यवेक्षिका श्रीम. प्रमिला गांधी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या संघाचे कौतुक केले.
या संघाला क्रीडा शिक्षक श्री. नितीन सांडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशानंतर आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी संस्थेतील मान्यवर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.


