( रत्नागिरी )
जागतिक आध्यात्मिक गुरू आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या रत्नागिरी दौऱ्याने संपूर्ण शहर भक्तीमय आणि चैतन्यदायी ऊर्जेने उजळून निघाले. गोगटे कॉलेजच्या क्रीडांगणावर आयोजित महासत्संगासाठी हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती. गुरुदेवांच्या दिव्य उपस्थितीमुळे हा सोहळा रत्नागिरीकरांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.
भक्तांना संबोधित करताना गुरुदेवांनी भक्ती आणि प्रेमाच्या गूढ अर्थावर सखोल भाष्य केले. “ईश्वर कुठे दूर नाही. जिथे प्रेम आहे, तिथेच ईश्वर प्रकट होतो,” असे सांगत त्यांनी भक्ती ही केवळ उपासना नसून स्वतःला प्रेमात पूर्णपणे अर्पण करणे असल्याचे स्पष्ट केले. प्रेम गहिरे झाले की ते ध्यान आणि ज्ञानात रूपांतरित होते, असे त्यांनी नमूद केले.
एक सुंदर दृष्टांत देताना गुरुदेव म्हणाले, “मक्याला उष्णता दिली की तो पॉपकॉर्न बनतो. त्याचप्रमाणे कठोर व्यक्तिमत्त्व भक्ती आणि सत्संगात मऊ होते आणि मग जीवन हलके, गोड व रसमय बनते.” जीवन चैतन्यपूर्ण आणि उत्सवमय असावे, हा संदेश त्यांनी यावेळी दिला.
गुरुदेवांनी राग, द्वेष आणि क्षमाशीलतेवरही भाष्य केले. ज्यांना आपण माफ करू शकत नाही, ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि नकळत आपण त्यांच्यासारखेच वागू लागतो, असा इशाराही त्यांनी दिला. भक्तीच्या उपचारक्षम शक्तीवर भर देताना त्यांनी सांगितले की भक्तीमुळे भीती, चिंता, दुःख आणि एकाकीपणा दूर होतो, आत्मविश्वास वाढतो आणि अंतःकरण दृढ होते.
“जेव्हा अहंकार वितळतो, तेव्हा आत उरते तीच खरी भक्ती,” असे सांगत गुरुदेव म्हणाले की भक्ती आणि प्रामाणिक भावना फुलल्या की जीवन स्वतःच एक अखंड उत्सव बनते. गणेशोत्सव, आरती, कीर्तन, विठोबाची पालखी यांसारख्या परंपरांचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
या सोहळ्याच्या संयोजिका अँड जया सामंत यांनी यावेळेला आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरुदेव प्रत्यक्षात रत्नागिरीत आले हे आपल्या सगळ्या रत्नागिरीकरांचं खूप मोठं भाग्य आहे, असं मी समजते. आणि गुरुदेवांनी आज आपणा सगळ्यांना जगण्याचा सुंदर जो मार्ग दिलेला आहे. आजपासून तुम्ही सगळेजण ध्यान करणार आहात किंवा घरी जाऊन सगळेजण जो संकल्प घेणार आहात आणि गुरुदेवांनी स्वतः तुम्हाला सांगितलं आहे की, बघा यानंतर ज्या काही तुमच्या समस्या असतील किंवा जे काही तुमचं फील्ड असेल जिथे तुम्ही काम करत असाल तर, तिथे नक्कीच काहीतरी फरक पडणार आहे. तर मी एवढंच सांगेन की, प्रत्यक्षात भगवान येऊन आपल्याला जगण्याचा इतका सुंदर मार्ग देत आहेत. तर आपण सगळ्यांनी तो नक्की अंगीकारूया आणि गुरुदेवांना शपथ देऊया की, गुरुदेव आम्ही रत्नागिरीत इतके हॅपिनेस कोर्स करणार किंवा आम्ही सगळे टीचर बनणार आणि गुरुदेव परत आपल्या सगळ्यांचं कौतुक करायला नक्की रत्नागिरीत येणार.

कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे आरोग्यमंत्री तथा कॅबिनेट मंत्री प्रकाशराव आबिटकर, माजी आमदार व नगरपरिषदेचे अध्यक्ष विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांचा रत्नागिरी दौरा हा त्यांच्या महाराष्ट्रातील सहा दिवसांच्या व्यापक दौऱ्याचा भाग असून, या दौऱ्यात त्यांनी धार्मिक नेते, राजकीय नेतृत्व, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, महिला आणि तरुणांशी थेट संवाद साधला आहे.
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशावर भाष्य करताना गुरुदेव म्हणाले, “या भूमीत भक्ती आणि शौर्य नेहमीच एकत्र जागृत झाले आहेत.” छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, भक्ती आणि धैर्याची ही परंपरा आजही जिवंत आहे. “१२ व्या शतकातील भक्ती चळवळीची लाट पुन्हा उभी करण्याची जबाबदारी आपली आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात वाढत असलेल्या तणाव, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि एकाकीपणाच्या पार्श्वभूमीवर गुरुदेवांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सत्संगातून बाहेर पडताना अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणि मनात शांतता दिसत होती. पहिल्यांदाच सहभागी झालेल्यांसाठी ही संध्याकाळ अंतःशांती आणि निखळ आनंदाचा अनोखा अनुभव देणारी ठरली.

