(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल भागात गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या तरुणाला डीबी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १७८.५ ग्रॅम गांजा आणि गांजा विक्रीसाठी वापरली जाणारी दुचाकी, असा एकूण सुमारे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील अमली पदार्थांच्या व्यवहारावर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीकडून गांजाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती डीबी पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पथकाने जे. के. फाईल परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दोन पंचांसमक्ष झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचा १७८.५ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच गांजा विक्रीसाठी वापरली जात असल्याचे निष्पन्न झालेली TVS Ntorq 125 दुचाकी, अंदाजे ५५ हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकारे या कारवाईत एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी सूरज परशुराम नंदिवले (वय २४), सध्या रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी, रत्नागिरी, मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अमली पदार्थविषयक कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई पोउनि सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ दीपक साळवी, पोहेकॉ शांताराम झोरे, पोहेकॉ दिनेश आखाडे, पोहेकॉ भालचंद्र मयेकर, पोकॉ अमित पालवे आणि पोकॉ निलेश शिंगवे यांच्या पथकाने केली आहे.

