(राजापूर)
राजापूर मराठा समाज सेवा संघासाठी समर्पीत भावनेने काम करताना समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम मराठा समाज सेवा संघाचे आधारस्तंभ असलेल्या गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांनी केले. त्यामुळे भविष्यात मराठा समाज सेवा संघाचे काम आणि कार्य अधिक जोमाने सुरू ठेऊन खऱ्या अर्थाने शहाजीराव खानविलकर यांना आदरांजली अर्पण करूया अशा शब्दात मराठा समाज सेवा संघाच्या वतीने कै. खानविलकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
राजापूर मराठा समाज सेवा संघाचे आधारस्तंभ व खजिनदार गुरूवर्य शहाजीराव खानविलकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रविवारी मराठा समाज सेवा संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा बोर्डींग सभागृहात मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत कै. खानविलकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी अध्यक्ष पवार यांच्या हस्ते कै. खानविलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वहाण्यात आली.
याप्रसंगी प्रकाश पवार, जगदीश पवार, नरेंद्र मोहिते, एकनाथ लाड, विनोद पवार, विनायक सावंत यांनी कै. खानविलकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष पवार यांनी कै. खानविलकर यांचे मराठा समाज सेवा संघ व मराठा समाजासाठी मोलाचे योगदान आहे. त्यांच्या निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे. भविष्यात सगळयांनी एकसंघपणे मराठा समाज सेवा संघाचे काम अधिक प्रभावीपणे करून पुढे नेऊया तीच खरी कै. खानविलकर यांना आदरांजली ठरेल असे नमुद केले.
याप्रसंगी हर्षदा खानविलकर, सुधीर तावडे, प्रकाश ढवळे, नंदकिशोर चव्हाण आदींसह मराठा समाज सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

