(राजापूर / वार्ताहर)
कोकणातील प्रामुख्याने राजापूर, लांजा आणि संगमेश्वर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागात काही जमीन दलालांकडून कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये यामुळे अस्वस्थता पसरली असून शासनाने सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दलालांकडून पैशाच्या जोरावर जमीनमालकांना अमिषे दाखवून सोन्याच्या भावाच्या जमिनी अत्यल्प दरात खरेदी करून त्या परप्रांतीय खरेदीदारांकडे वळवल्या जात असल्याचा आरोप आहे. विशेषतः कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील काही डोंगराळ व पडीक जमिनी “उपयोग नाही” असे सांगून लक्ष्य केल्या जात असल्याचेही सांगितले जाते. या जमिनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानंतर भविष्यात त्यांचा नेमका काय उपयोग होणार, याबाबत स्थानिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.
काही व्यवहारांमध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचीही भीती व्यक्त केली जात असून, पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात स्थायिक झालेल्या काही व्यक्तींच्या माध्यमातून हे व्यवहार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
एका सामाजिक कार्यकर्त्याने लवकरच या प्रकरणाचे पुरावे गोळा करून जनतेसमोर मांडणार असल्याचा दावा केला असून, त्यापूर्वीच शासन व प्रशासनाने या व्यवहारांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संघटित पद्धतीने “साम, दाम, दंड, भेद” नीतीचा वापर करून कोकणातील जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासन, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने कोकणातील सुरू असलेल्या जमीन व्यवहारांचा व्यापक आढावा घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

