( राजापूर / तुषार पाचलकर )
शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत रग्बी असोसिएशन राजापूर आणि जिल्हा परिषद शाळा ओझर नंबर एक येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींच्या संघात कर्णधार दुर्वा मंगेश गुरव, उपकर्णधार पल्लवी पांडुरंग मालपेकर, दुर्वा सतीश रेगे, वैदेही योगेश नवलू, श्रुती नरेश पळसमकर, अनन्या विवेक रेगे, उर्वी अनंत गोसावी, रिया प्रकाश नवलू, काव्या उमेश रांबडे आणि आरोही संजय नवलू यांचा समावेश आहे.
याचबरोबर १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून साई राजेश गुरव याची निवड झाली आहे. राजापूर तालुक्यातून १४ वर्षांखालील मुलांचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाला होता.
या यशाबद्दल सर्व खेळाडू, पालकवर्ग आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. रग्बी असोसिएशन रत्नागिरी संलग्न रग्बी असोसिएशन राजापूरचे जिल्हा प्रमुख प्रशिक्षक डॉ. योगिता खाडे, राजापूर तालुका प्रमुख प्रशिक्षक श्री. युवराज मोरे तसेच सहप्रशिक्षक श्री. शैलेन्द्र बनसोडे यांनी खेळाडूंना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


