(राजापूर / तुषार पाचलकर)
सुरेंद्र तुकाराम शेट्ये (मूळ गाव मूर, तालुका राजापूर – कागदपत्रावरील पत्ता: दिवा, मुंबई) यांचे पॉकेट दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हरवले होते. या पॉकेटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, विविध बँकांची ATM कार्डे आणि काही रोख रक्कम होती.
हे हरवलेले पॉकेट पाचल येथील लतीफ थोडगे यांच्या हाती सापडले. त्यांनी प्रामाणिकपणा आणि माणुसकीच्या भावनेतून सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केले, ज्यामध्ये पाचल ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे (सिद्धिविनायक कटपीस सेंटर – पाचल एस.टी. बस स्थानकाजवळ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
सदर पोस्ट पाहताच सुरेंद्र शेट्ये यांनी तात्काळ विनायक सक्रे यांच्याशी संपर्क साधला आणि आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सिद्धिविनायक कटपीस सेंटर, पाचल येथे येऊन आपल्या हरवलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. कृतज्ञता म्हणून शेट्ये यांनी श्री. लतीफ थोडगे यांना रोख रक्कम भेट दिली.
लतीफ थोडगे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

