(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिरकरवाडा-पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने हेरॉईनसदृश पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून रत्नागिरी शहर पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. ऋषीकेश संतोष चव्हाण (२२, रा. भैरीमंदिरजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून तीन ग्रॅम वजनाचा हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, दुचाकी आणि प्लास्टिकची पिशवी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५च्या सुमारास मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली. ऋषीकेश चव्हाण हा एमएच ०८ बीएल ५५१३ क्रमांकाच्या दुचाकीवर बसलेला असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याच्याकडे तपासणी केली असता पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत खाकी रंगाचा हेरॉईनसदृश पदार्थ आढळून आला. प्लास्टिक पिशवीसह पदार्थाचे वजन पाच ग्रॅम होते. त्यापैकी प्लास्टिक पिशवीचे वजन दोन ग्रॅम असून, निव्वळ तीन ग्रॅम हेरॉईनसदृश पदार्थाची किंमत ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असून, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन ग्रॅम हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह ९० हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ऍक्सेस दुचाकी (एमएच ०८ बीएल ५५१३) आणि पदार्थ ठेवण्यासाठी वापरलेली पारदर्शक प्लास्टिकची पिशवी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश पांडुरंग आखाडे (ब. नं. ५३८) यांनी फिर्याद दिली. त्यावरून ऋषीकेश संतोष चव्हाण याच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.


