(राजापूर / तुषार पाचलकर)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने अनुस्कुरा घाट व अनुस्कुरा हायस्कूल परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
उपक्रमाचा शुभारंभ तळवडे गावचे ९८ वर्षीय सुपुत्र व माजी शिक्षक सखाराम साळवी यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाची लागवड करून करण्यात आला. अनुस्कुरा घाटात भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या वड, पिंपळ, आंबा, काजू यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली, तर अनुस्कुरा हायस्कूल परिसरात विविध फुलझाडे लावण्यात आली.
यावेळी सखाराम साळवी म्हणाले, “लावलेली ही झाडे दीर्घायुषी होवोत आणि खापणे महाविद्यालय तसेच राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे समाजोपयोगी कार्य असेच अखंड सुरू राहो. समाजाला अशा विधायक उपक्रमांची नितांत गरज असून भविष्यात या कार्याची व्याप्ती अधिक वाढावी.”
उपक्रमादरम्यान अनुस्कुरा घाटातील स्टॉलधारकांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या नावाने लावलेले वृक्ष जतन करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
या उपक्रमात जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, गणेश चव्हाण, वृक्षमित्र अमर खामकर, आप्पा साळवी, कवी विराज चव्हाण, दीपक आयरे, पत्रकार तुषार पाचलकर, पत्रकार उमेश दळवी, संजय कानसे, प्रकाश सावंत, रमेश काटकर, प्रमोद पवार, सचिन तावडे, मंगेश चव्हाण, ग्रामसेवक संतोष चव्हाण, अभिजीत कोरे, अरविंद बोरकर, आदर्श शिक्षक दीपक नागवेकर, सुनील कदम, गणेश सुतार, राजू पत्की, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, चंद्रहास नारकर, तसेच खापणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, मधुकर साटम आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

