(रत्नागिरी / वार्ताहर)
युवकांना विविध विधायक उपक्रमांशी जोडून त्यांच्यात नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ पोर्टलचा जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माय भारत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सूर्यवंशी बोलत होते. जिल्हा युवा समन्वयक स्वप्निल देशमुख यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘माय भारत’ पोर्टलची कार्यपद्धती, उपक्रम आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, “युवकांना प्रगल्भ आणि सक्षम करण्यासाठी ‘माय भारत’ हे प्रभावी व्यासपीठ आहे. युवकांच्या ऊर्जेला विधायक दिशा देण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी या व्यासपीठाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे.”
शासकीय कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांचा स्वयंस्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलचा सुयोग्य पद्धतीने वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. जनजागृतीच्या विशेष मोहिमा राबविताना ‘माय भारत’च्या माध्यमातून युवकांचे सहकार्य घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवकांना सामाजिक कार्य, स्वयंसेवा, जनजागृती आणि विविध शासकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ‘माय भारत’ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी या पोर्टलशी जोडून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीला अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, जिल्हा उद्योग केंद्राचे संकेत कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

