(रत्नागिरी)
तरवळ (ता. रत्नागिरी) येथील माचिवलेवाडी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दीर्घकाळ रक्तपुरवठा कमी होण्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या ७० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव शिवाजी दामा माचिवले (वय ७०, रा. तरवळ, माचिवलेवाडी) असे असून, ते गेल्या सुमारे २८ वर्षांपासून रक्तपुरवठा कमी होण्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रत्नागिरी येथील डॉ. पेवेकर यांच्या दवाखान्यात तसेच मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अपेक्षित बरे वाटत नसल्याने आणि दीर्घकालीन त्रासाला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ही घटना दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते ३.४५ या वेळेत घडली. घराच्या छपरातील लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आ.मृ. क्र. ८०/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करीत आहेत.

