(पाली / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली नं. १’ येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावत शाळेत प्रथमच प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांचे हसतमुखाने स्वागत केले.
पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्सुकता आणि निरागस भाव पाहून संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “शासकीय शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे, हा आमच्या सरकारचा प्रमुख हेतू आहे. ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालावी, हा आमचा ध्यास आहे.”
ते पुढे म्हणाले की, “शासकीय शाळांचा सर्वांगीण विकास, शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, सुसज्ज इमारती उभारणे तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावणे यावर सरकार विशेष भर देत आहे. शासकीय शाळा या खाजगी शाळांच्या तोडीस तोड व्हाव्यात आणि पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.”
शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अॅड. सुयोग कांबळे, शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, सरपंच विठ्ठल सावंत, माजी सरपंच संदीप गराटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, अॅड. सागर पाखरे, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
फोटो : पाली नं. १ येथील शाळा प्रवेशोत्सवावेळी पहिलीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पालकमंत्री उदय सामंत, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, संदीप गराटे व मान्यवर.

