(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
खेर्डी एमआयडीसी परिसरात मध्यरात्री संशयास्पदरीत्या फिरताना एका तरुणाच्या ताब्यात कॉपरच्या तारा आढळून आल्याने चिपळूण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. प्रणय रमाकांत जाधव (२१, रा. सती, समर्थनगर, चिपळूण) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील कॉपरच्या तारांच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी पहाटे २.४५च्या सुमारास खेर्डी एमआयडीसीतील चामुंडा स्टील ॲन्ड टिंबर या दुकानासमोरील रस्त्यावर प्रणय जाधव हा संशयास्पदरीत्या आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे प्लास्टिकच्या गोणीमध्ये कॉपरच्या तारा असल्याचे निदर्शनास आले. या तारांबाबत त्याच्याकडे मालकी हक्क किंवा त्या मालाचा स्रोत यासंदर्भात समाधानकारक माहिती अथवा स्पष्टीकरण देता आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे संशयाच्या आधारे पोलिसांनी त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेतला. कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या कॉपरच्या तारा आणि एक प्लास्टिकची गोणी असा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत १ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार दिपराज प्रकाश पाटील (ब. नं. १४०७) यांनी फिर्याद दिली. त्यावरून प्रणय रमाकांत जाधव याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींकडे पोलिसांचे लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. जप्त केलेल्या कॉपरच्या तारांचा नेमका स्रोत काय, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत आणि त्या संबंधित तरुणाकडे कशा आल्या, याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


